‘तारे जमिन पर’ आणि ‘जिंकी रे जिंकी’.

Posted जानेवारी 7, 2008 by geetajoshi
Categories: Uncategorized

नुकतेच दोन सुंदर चित्रपट बघण्याचे योग आले. एक ‘तारे जमिन पर’ आणि  दुसरा मराठी , ‘जिंकी रे जिंकी’.
एरवी सिनेमा जुना झाल्याशिवाय मी बघत नाही. अतीप्रसिद्धीमुळे थियेटरवर उडणारी गर्दी , ते मल्टिप्लेक्सचे अव्वाच्या  सव्वा दर हे सगळं टाळायचं असेल तर काही आठवडे वाट  पहाणं अधिक बरं वाटतं. काही परीक्षणं वाचली, कुणाच्या तोंडून प्रशंसा ऐकली तरच मी चित्रपट बघण्याचं धाडस करते. पुन्हा तो  मल्टिप्लेक्समध्ये पाहीला आणि वाईट निघाला तर फारंच  पैसे फुकट गेल्याची हळहळ येते , त्यापेक्षा वाट पाहीलेली बरी.  परंतू माझेच हे सर्व नियम तोडून मी हे दोन्ही चित्रपट रीलीज झाल्याबरोबर लगेच पाहीले. कारण पूर्वप्रसिद्धीने भितीवर मात केली.

तारे जमिन पर  हा अमीर खानचा असल्यामुळे तो  बघण्याची मला उत्सुकता होतीच. तो मतीमन्द मुलांबद्दल आहे असं वाटलं होतं ; पण प्रत्यक्षात तो अगदी वेगळा आढळून आला. डिस्लेक्षिया ह्या मुलांमध्ये आढळून येणार्या समस्येबद्दल किंवा लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल हा सिनेमा भाश्य करतो.  अनेक वर्ष शिक्षणक्षेत्रात काढूनसुद्धा डिस्लेक्षिया ह्या प्रकाराची, तो असतो , यापलीकडे मला  काहीच माहिती नव्हती ह्याचं आता मला आश्चर्य वाटतंय.

        कथेचा नायक आहे एक नउ -दहा वर्षाचा मुलगा; तिसरीत शिकणारा. धड लिहिता वाचतादेखील न येणारा, त्यामुळे अभ्यासात मागे पडलेला, नापास होउ घातलेला, सर्वांनी खोड्याळ , मठ्ठ असे शिक्के मारलेला, सतत शिक्षा होवून वर्गाबाहेर उभा. शिक्षेच्या भितीने एक दिवस तो शाळेतून पळून जातो आणि दिवसभर ईकडेतिकडे फिरून संध्याकाळी गुपचूप घरी जातो.ह्याचा पत्ता लागल्यावर शाळेचे शिक्षकही खोलवर जाउन विचार न करता , त्याला मतिमंद मुलांच्या शाळेत घालण्याचा सल्ला देउन मोकळे होतात. वडीलही त्याला ‘सुधारण्यासाठी’ होस्टेलला नेउन टाकतात.
    ईथेही मूळ प्रॉब्लेम तसाच राहातो. परत मार , शिक्षा , अगणित अपमान , शिवाय आपल्याला आई- वडीलांनी दूर लोटल्याचं दुःक्ख ! त्या लहानग्याचं भावजीवन उद्ध्वस्त होउ लागतं. न्यूनगंड, भय , निराशा , अविश्वास , राग. नुसता भावनाकल्लोळ. एका छोट्या जीवाला फार होतं ते सगळं. त्याची चित्रकला , त्याची तरल कल्पनाशक्ती , त्याचा खेळकर आणि खोडकरपणा , सर्व लयाला जाऊ लागतं.

    आणि मग येतो एक नवा कलाशिक्षक , तात्पुरत्या वर्षासाठी (temporary). तो कोणी देव नसतो, पण माणूस नक्किच असतो. स्वतःही अश्या अडचणीवर मात करून मोठा झालेला , मुलांमध्ये रस असलेला, मुलांना वेळ देणारा , त्यांच्या समस्या  समजून घेणारा. तो पालकांना आणि मुख्याध्यापकांना समजावून देतो की हा प्रॉब्लेम म्हणजे  मतिमंदत्व नव्हे. आपला कथानायक हा अतिशय तरल कल्पनाशक्ती असलेला एक बुद्धिमान मुलगा असतो. तो उत्तम चित्रकारही असतो. त्याला आकार , अवकाश(space), ह्या संकल्पना थोड्या जड जात असतात. त्यामुळे त्याला आकडे , अक्षरं ओळखायला आणि लिहायला त्रास पडत असतो. मेंदूत थोडा वायरिंगचा प्रॉब्लेम असतो. लहानपणापासून ह्या समस्येकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे त्याला धड लिहिता-वाचताही येत नसतं. परंतू त्याचं जनरल नॉलेज उत्तम असतं. थोड्या प्रयत्नांनंतर तो नक्कीच सुधारणार असतो. आणि तसं होतं.

      आता मला प्रश्न पडतो की अभ्यासात ढ गणल्यागेलेल्या किती मुलांमध्ये हा प्रॉब्लेम असेल? त्याला एक सर मिळाले ज्यांनी त्याला समजून घेतलं , पण असे किती बळी प्राथमिक शिक्षणाच्या वेदिवर जात असतील? समाज आणि मुख्यतः शिक्षक ह्या समस्येबाबत कितपत संवेदनाशील् असतात? कितीजणांना  डिस्लेक्षिया म्हणजे काय हे माहीत असतं ? (मलातरी नव्हतं ) .

      मध्यांतरानंतरचा सिनेमा थोडा फिल्मी होतो. परंतू तो हिंदी व्यावसायिक सिनेमा असल्यामुळे तेवढं माफ आहे.
मध्यवर्ती भूमिकेतील दर्शिल सफरीचं कौतूक करावंस वाटतं. त्याचं ते वर्गात काही न समजणं, स्वप्नरंजन आणि होस्टेलला ‘टाकून्’ दिल्यानंतरची उदासी, सर्व अगदी खरंखुरं वाटतं.

     एक सुन्दर आणि जनजाग्रुती करणारा चित्रपट बनवल्याबद्दल अमीर खानचं हार्दिक अभिनंदन्. आणि ह्या कथेवर, समस्येवर चित्रपट बनवण्याचा ध्यास घेउन आठ वर्ष धडपडून तो प्रत्यक्षात आणणार्या अमोल गुप्ते ह्यांचंही  हार्दिक अभिनंदन्. असेच उत्तमोत्तम चित्रपट पुढेही आमच्यासाठी आणा ही विनंती.

माझे बालपणीचे साथीदार.

Posted सप्टेंबर 10, 2007 by geetajoshi
Categories: Uncategorized

 मला आवडलेली पुस्तकं:

     वाचनाचा छंद तसा लहानपणापासून आहे. वाचताही येत नव्हतं त्या वयापासून माझ्याकडे माझी पुस्तकं होती. माझी अंकलिपी मला अजून लक्षात आहे. ‘आरूणि आणि ईतर गोष्टी’ मधल्या सर्व गोष्टी वाचता येत नसतानाही आईकडून ऐकून पाठ झाल्या होत्या. चांदोबातली चित्रं , श्रावणातल्या कहाण्यांच्या संग्रहातली चित्रं अश्या चित्रमय पुस्तकांतून आईचं बोट धरून माझा वाचनप्रयत्न सुरू झाला . श्रावणातल्या कहाण्या म्हणजे चित्रविचित्र गोष्टींचा जणू खजिनाच. अजूनही श्रावणात लहान होवून आईच्या कहाण्या ऐकाव्यात असं वाटतं.

      माझ्या शाळेत , म्हणजे बालमोहन विद्यामन्दीरमध्ये , बक्षिस म्हणजे पुस्तके द्यायचीच पद्धत होती. वार्षिक परिक्षेमध्ये प्रत्येक तुकडीतल्या पहिल्या दहा नंबरांना , प्रत्येक विषयातल्या हाय्येस्ट मार्क मिळवणार्या मुलांना , अशी भरपूर बक्षिसांची रेलचेल असे. पण बक्षिसं म्हणजे कुपन्स असत. कुपन घेउन आयडियल बुक डेपोमध्ये जायचं आणि मनासारखी पुस्तकं खरेदी करायची. तिथे गेल्यावर बहुदा पैसे कमी पडायचे. मग बाबांकडून त्यात भर घालून मनसोक्त पुस्तक खरेदी व्हायची.आता लहानपणापासून असं वाचनाचं बाळकडू मिळाल्यावर वाचनाची आवड निर्माण होणं स्वाभाविकच आहे.      

          शालेय वयात शाळेच्या प्रोत्साहनामुळे खूप वाचायला मिळालं. माझं पहिलं वहिलं पुस्तक मला अजून आठवतंय. शैलजा राजेंच ‘मन्दार’ नावाचं ते पुस्तक होतं. तिसरीत मिळालेलं; (गणितात १०० मार्कं मिळाल्याबद्दल!!!). मोठ्या चिकाटीने मी ते वाचून काढलं. घर सोडल्यावर मन्दारवर आलेल्या प्रसंगांमुळे मी अस्वस्थ झाले होते. मन्दारनंतर मला वाचायचा छंद लागला तो अजून आहेच .

       आम्ही तिघी बहीणी. त्यामुळे तिघींची मिळून दरवर्षी कमीतकमी तीनतरी पुस्तकं असायची.  भा. रा. भागवतांची सर्व पुस्तकं शाळेच्या बक्षिसखाती जमा आहेत. सूर्यावर स्वारी , मुक्काम शेन्डेनक्षत्र , फास्टर फेणे, जयदीपची जंगलयात्रा , भुताळी जहाज , अशी अनेक पुस्तकं  आजही स्मरणात ताजी आहेत.  सूर्यावर स्वारी वाचल्यानंतर अनेक वर्ष मला वाटायचं की एखादा धुमकेतू खरंच प्रुथ्वीचा लचका तोडेल आणि त्यावर मी असेन तर बरं होइल. भुताळी जहाज वाचल्यावर अनेक रात्री रामनामाचा जप करत झोपले आहे. गेटवे ऑफ इंडीयाला बोटीत बसतानासुद्धा एखादं भूत दिसेल असं वाटायचं. भा. रा. भागवतांच्या बहुतेक सर्व पुस्तकांमध्ये दूरच्या देशांची वर्णनं असायची. ती वाचून माझ्यासारखी भूगोलशत्रूसुद्धा नकाशे बघायला प्रव्रुत्त व्हायची, एवढा त्या पुस्तकांचा प्रभाव होता.
फास्टर फेणे खरंच फुरसुंगीला रहातो असं मला वाटायचं. अजूनही मला एकदा फुरसुंगीला जायची सुप्त ईच्छा आहे. 
 
     गोट्या , चिन्गी हे तर अगदी मित्रच होते . त्यांचे सर्व भाग वाचून काढले की परत एकदा पहील्यापासून सुरवात करायला मोकळी. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदातरी ह्या सर्व मित्रांना मी भेटायची.

       शरावतीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलय हे आता आठवत नाही, पण त्यातलं रोमांच अजून मनात जागं आहे. शेवटच्या प्रकरणात शरावती वायूरूपातून हळूहळू घनरूपात प्रकट होते आणि वरमाला घेऊन सलज्ज नायकापुढे ऊभी राहाते तो क्षण अविस्मरणीय आहे.हॅरी पॉटरमधल्या लॉर्ड वॉल्डेमॉर्टची तुलना मला वायूरूपात वावरणार्या ‘शरावतीचा शोध’ मधल्या खलनायकाशी करावीशी वाटते . तो शरावतीला कडेकोट पहार्यातून पळवून नेतो तेव्हा तिच्या खिडकीवरच्या नाजूक घंट्या मन्जूळ कीणकीणतात , तेव्हां सर्वांच्या लक्षात येतं की तिचं अपहरण झालंय. हा प्रसंगदेखील मी अजून विसरू शकत नाही.
     दुर्गा भागवतांच्या ‘आंधळी’ ह्या हेलन केलरच्या जीवनावरच्या पुस्तकाने मला  फारच भारावून टाकलं होतं. मध्यंतरी त्यावर आधारीत ‘ब्लॅक’ हा सिनेमा पाहिला. परंतू पुस्तकाची मोहीनी काही वेगळीच आहे. संस्कारक्षम वयात हेलनच्या जिद्दीचा, जीवनाकडे बघण्याच्या सकारात्मक द्रुष्टीकोनाचा माझ्या मनावर फारच परीणाम झाला होता. अजूनही हे पुस्तक मला मरगळल्या क्षणांना नवीन उभारी देतं.

   माझ्या बालपणीच्या ह्या साथीदारांपैकी बरचसे अजूनही पुस्तकरुपाने मला साथसोबत करतात. जे पुस्तकरूपात नाहीयेत्, तेही स्मृतीरुपाने माझ्याजवळंच आहेत . माझ्या मुलीनेही ह्या माझ्या  मराठी मित्रांची ओळख करून घ्यावी ही माझी ईच्छा अजून पूर्ण झाली नाहीये.

सुर्यास्त

Posted सप्टेंबर 10, 2007 by geetajoshi
Categories: Uncategorized

गजराच्या कर्कश्य आवाजाने

आज पहाटेच जाग आली,

मग कोकीळकूजन झाले

पण तुला ऐकवायचे राहून गेले.

जाग आली तेव्हा अन्गावर

पान्घरूण अलवार चान्द्ण्याचे
खिडकीत दुधाळ चान्द होता

पण तुला दाखवायचा राहुन गेला.

चहा-पाणी होता होता

सुर्योदय झाला

तुझ्यासवे पाहायचा

तो मी एकटीनेच पाहीला.

प्रसन्न अश्या ह्या सकाळी

माझ्या मनात उमटले गाणे

तुझ्या घड्याळाच्या तालावर

मी ते मनातच म्हटले.

तुला निरोप देताना

ही आशा आहे मनात

सुर्यास्त पाहाताना तरी

असेल मझ्या हाती तुझा हात.

मैत्रीण

Posted सप्टेंबर 10, 2007 by geetajoshi
Categories: Uncategorized

ती माझी जीवाभावाची सखी. कॉलेजमधली मैत्रीण. साधी-भोळी, निर्मळ मनाची , हसरी . सर्व ‘मुलींच्या गोष्टींमध्ये’ तिला भारी रस. मेन्दी काढणे, चेहेर्याची शोभा वाढवण्यासाठी कसले कसले लेप लावणे , नवीन नवीन केशभूषा करणे ह्या सगळ्यात ती पटाईत . लिंकिंग रोडला जाऊन नव्या नव्या फॅशनचे कपडे घासाघिस करून स्वस्तात मिळवणे हा तिच्या डाव्या हातचा मळ. भाबड्या स्वभावामुळे तिला विनोद जरा उशीराच समजत, त्यामुळे ग्रुपमध्ये तिची ताणायला मजा यायची. पण तीसुद्धा ते एंजॉय करायची, अजिबात न रागावता.

माझ्या ताईच्या लग्नात ताईचा मेकप बरा नाही जमला. तो तिने छान दुरुस्त केला. तेव्हापासून तिचीमाझी फारच गट्टी जमली. मग वेगळा विषय घेण्यासाठी तिने कॉलेज बदललं, पण आमची मैत्री कायम राहीली. तिची मम्मा, डॅडी, तिची आऊ, तिची धाकटी बहीण , सगळ्यांना माझ्या तिच्याकडे होणार्या फेर्याची, वेळीअवेळी होणार्या फोनकॉलची सवयच होऊन गेली. माझ्या घरीही तिची सवय झाली.

आगाऊपणा आमच्या अंगात वयानुरूप होताच. एका मैत्रीणीला दगा देणार्या तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी फोन करून आम्ही दोघींनी त्याच्या आईवडीलांकडे त्याची चुगलीही केली होती. (आता आठवलं तरी लाज वाटते.) तेव्हां आपण फारंच महान काम केलंय अशी आमची खात्री होती.

कॉलेजच्या फनफेअरमध्ये  भेळपुरीचा स्टॉल लावण्याचं धाडसही आमच्या ग्रुपने केलं होतं. तिच्या घरी चटण्यांना चव आणण्या्चा निष्फळ प्रयत्न करून ,तिच्या मि्क्सरची वाट लावून, कीचनमधला पसारा तिच्या आऊला आवरायला ठेऊन आम्ही कॉलेजला स्टॉल लावायला धावलो होतो.शेवटी कशीबशी ती भेळपूरी एकदाची विकून संपवली होती . माझा तो पाककलेचा पहीलाच प्रयत्न होता, पण तिचाही तो पहिलाच होता हा मला शोध लागला होता.

जेमतेम पदवी पदरात पडता- पडता बाइसाहेबांना मागणी आली. घरासमोरच राहणारा जावई मिळाला म्हणून तिच्या आई-वडीलांचा आनंद  गगनात मावेना. हुशार, देखणा, कर्त्रुत्ववान , उत्तम करीयर , घरी फक्त सासू , एक विवाहीत नणंद, सगळंच कसं हवं तसं.

 ती फारशी खूश नव्हती. तिला काहीतरी करायचं होतं, नोकरी, किंवा ब्युटिपार्लर, किंवा कसलातरी कोर्स. पण डोळ्यापुढे ठोस ध्येय नसलेल्या तरूण मुलींच जे होतं तेच तिचं झालं……. लग्न. त्या मागणी घालणार्याशीच.

तिचा साखरपुडा झाला तेव्हा माझं एमेस्सी चालू होतं . तिचा साखरपुड्याचा मेकप माझ्या देखरेखीखाली झाला(!!!!!). माझा नटायचा फारच उल्हास. त्यामुळे मला अगदी परीकथेतला  प्रसंग बघावा तसा तो मेकप  लक्षात आहे. फारच सुंदर दिसली ती त्या दिवशी. तिच्या घनदाट केसांचा पिसारा फुलवून त्याची केलेली सुंदर केशरचना , त्यावर लावलेली चकमक , तिच्या नाजूक धारदार नाकावरची लखलखणारी चमकी , तिच्या सावळ्या चेहेर्याला खुलून दिसेल असा हलकासा मेकप .फारच सुंदर दिसली ती त्या दिवशी. आकाशी रंगाची साडी, टिकल्या आणि मणी लावलेली, त्याच्या आवडीची, आणि तिच्या नावडीची, त्याने त्याच्याच आवडीची जबरदस्तीने घ्यायला लावली म्हणून .
आणि मग हलक्या कुरबूरी कानावर येतंच राहील्या. कारण तिला नो चॉइस नो वॉइस. तो फारच हुशार, महत्वाकांक्षी , करियरमध्ये भरभर वर गेला. त्याचं विश्व बदलत गेलं, क्षितिज रुन्दावत राहीलं. वर्तुळ बदलत गेलं. ती मात्र तशीच राहीली; साधीभोळी, सरळ, देखावा नाही, शो बिझनेस नाही . त्याच्या गतीशी जुळवणं तिला जड जायला लागलं आणि तिच्या सरळ , साध्या अपेक्षा त्याला आवडेनाश्या झाल्या . परीणामी कधीही तिला फोन केला तरी एकच पालुपद , ‘ आज आमचं चांगलंच वाजलं.’ मला ह्याचा ईतका कंटाळा यायला लागला की मी तिचा फोन कधी कधी टाळायला लागले.

वर्षामागून वर्षं जात राहीली. तिला एक गोड छोटूली झाली . सर्वच विसंवादी ( म्हणजे जवळ जवळ सगळ्याच ) जोडप्यांमधे मुलांना वाढवण्यावरून होतात तसे वाद त्यांच्यात होत राहीले. ती अधिकाधिक असमाधानी राहीली. तो अधूनमधून वाहावत राहीला . पण आता हळूहळू त्यांच्या संसाराची गाडी योग्य रुळावरून धावायला लागली असं वाटलं.
ती मध्ये मध्ये संकल्प सोडायची  — काहीतरी करण्याचा, आर्थिक द्रुष्ट्या स्वतंत्र होण्याचा  , स्वतःची आयडेंटीटी बनवण्याचा . पण तो प्रत्यक्षात कधी आला नाही.

अशातच अचानक एक दिवस त्याला तो जीवघेणा आजार झाल्याचं लक्षात आलं. ती हादरून गेली. दोन वर्ष अथक उपचार. तो फार खंबीरपणे उभा राहीला. ती सावलीसारखी त्याच्यापाठीशी उभी होती.

 दोन अडीच वर्षांची त्यांची म्रुत्यूशी झुंज ,  नुकतीच संपली . तो सुटला , हालअपेष्टांतून . ती राहीली मागे . एका अर्धवट वयाच्या मुलीला मोठं करायला , तिला आई – वडील , दोघांची माया द्यायला , आजारी सासूची काळजी घ्यायला.

माझी साधीभोळी मैत्रीण , त्याने तिला कधी काही कमी पडू  दिलं नाही , पण ईथून पुढे काय ? चाळीशीच्या उम्बरठ्यावर  असूनही जगाचा विशेष वारा न लागलेली ती आता काय करेल ? ईश्वरा , तिला बळ दे , रस्ता दाखव ,
 आणि  मला बळ दे ; तिला भेटण्याचं , सांत्वन करण्याचं  .